कपाशीची प्रत राखा, भाव अधिक मिळवा!
निलेश चाळक बीड - कापसाची प्रत राखण्याकरिता कपाशीची वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. व्यामुळे प्रतवारी करणे आवश्यक ठरते.
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकरी सहसा कापूस बाजारात विकायला आणतो. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता कपाशीची वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणत: ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. या वेचण्यामध्ये चांगल्या प्रतिचा कापूस मिळतो. नंतरच्या वेचण्यामध्ये मिळालेला कापूस हलक्या प्रतिचा असतो. आपल्याकडे वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो.
कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतक-यास त्याने उत्पादित केलेल्या कापसाला योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रूईचे प्रमाण, स्पर्श, धाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, माती इ. चे प्रमाण, कापसात असलेले अपरिपक्व व पिवळी टिक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण विचारात घेतले जाते. कापसात असलेल्या ओलाव्यामुळे कापसाच्या प्रतिवर परिणाम दिसून येतो. जास्त ओलावा असल्यास कापूस पिवळसर दिसतो. किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या किडक्या कापसाचे प्रमाण ठरवून प्रतवारी करणे आवश्यक ठरते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा