काळजी करू नका, 2019 मध्येही मलाच संधी मिळेल - मुख्यमंत्री
नागपूर:उद्योजकांना काळजी करण्याचं कारणं नाही कारण 2019 मध्ये लोक मलाच संधी देतील. त्यामुळं उद्योगांना सवलतीत वीज मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं दिली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९ मध्ये उद्योगांसाठी असलेल्या सवलती संपणार आहेत. या धोरणांमध्ये कमी वीज दरासह अनेक सवलती यात देण्यात आल्या आहेत. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय.
नविन औद्योगिक धोरणाचा विदर्भ आणि मराठवाड्यावा मोठा फायदा होणार. देशात एकूण जेवढी परकीय गुंतवणूक झाली त्यातली ४७ टक्के महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्राचं धोरण उद्योग स्नेही असल्यामुळेच ही गुंतवणूक आकृष्ट झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यक्रमात अनेक उद्योगपतींनी आपल्या भाषणात शंका उपस्थित केली होती. 2019 मध्ये या सवलती संपणार असून त्याच वर्षी निवडणुकाही आहेत. त्यामुळे या सवलती कायम राहणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. उद्योगपतींच्या भाषणांमधला तोच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या राजकीय विधानाला महत्व प्राप्त झालंय.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठी आंदोलनं झालीत. मराठा मोर्चा, आदिवासी, शेतकऱ्यांची, दलित संघटनांची अशी अनेक आंदोलनं झालीत. या आंदोलनांचा सरकारला फटका बसला मात्र त्याचा फार मोठा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर झाला नाही.
अनेक आंदोलनं हातळण्यात ते यशस्वी झाले. भीमा कोरेगाव आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरच्या मोर्चे आणि आंदोलनानंतरही भाजपने सांगली महापालिकेत यश मिळवलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची सरकार आणि पक्षावरची पकड आणखी घट्ट झाल्याचं बोललं जातंय.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मुख्यमंत्र्यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांचं हे वक्तव्य त्या पार्श्वभूमीवरही महत्वाचं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा